चिनी लोक भारताविषयी काय म्हणतात?
- विजय नाईक
चीनमधील सामान्य माणसाला भारताविषयी कुतूहल असले, तरी भारताची माहिती नाही. इंग्रजी भाषा व संगणक तंत्रज्ञान या दोन गोष्टींमुळे भारत विकासाच्या मार्गावर असलेला एक देश आहे, एवढीच सर्वसाधारण माहिती आमच्या बरोबर असलेल्या ली शान व ग्रेस या दोन दुभाषींना होती.
भारत व चीनदरम्यान सामंजस्य अधिक वाढावे, परस्परांच्या देशांची ओळख व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून चीनच्या नेत्यांचे प्रयत्न चालू आहेत. तेथील कम्युनिस्ट पक्ष व सत्तारूढ कॉंग्रेस पक्ष यांचे संबंध सलोख्याचे राहावे, म्हणून कम्युनिस्ट पक्षाने काही महिन्यांपूर्वी अध्यक्ष सोनिया गांधी यांना आमंत्रित केले होते. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, माजी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल फली मेजर यांनी चीनला भेटी दिल्या. भारत चीन नौदलाचे सरावही झाले. भारतातील इंग्रजी व त्यापेक्षाही भाषिक वृत्तपत्रांच्या ग्रामीण भागात असलेल्या प्रभावाची जाणीव तेथील नेत्यांना झाली आहे. चीनमधील भारतीय राजदूत श्रीमती निरुपमा राव यांची नियुक्ती परराष्ट्र सचिवपदी झाल्याचे वेगळे समाधान चीनचे परराष्ट्र मंत्रालय व सरकारी वर्तुळातून व्यक्त होत आहे, असे 5 ते 11 जुलैदरम्यान चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या पत्रकांच्या शिष्टमंडळाला चर्चेतून आढळून आले. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. त्याच्या कटू स्मृती अद्यापही कायम आहेत. दरम्यान पाकिस्तानबरोबर भारताची तीन युद्धे झाली. इंदिरा गांधी यांच्या काळात सिक्कीमला भारताचे 22 वे राज्य म्हणून संलग्न करण्यात आले. चीन अनेक वर्षे ही वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नव्हता. परंतु चीनने ते अलीकडे मान्य केले. अरुणाचल प्रदेशातील सोमदुरांग चू खोऱ्यात चीनने घुसखोरी केली होती. अरुणाचल प्रदेशावरही चीन दावा करीत आहे. भारताने तो फेटाळून लावला आहे. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हा भारताचा एक नंबरचा शत्रू असल्याचे विधान केले होते.
""चीन 2012 मध्ये भारतावर आक्रमण करणार,'' अशीही टिप्पणी "इंडियन डिफेन्स रिव्ह्यू' चे तज्ज्ञ भरत वर्मा यांनी नुकतीच केली. भारताने 1959 पासून दलाई लामा यांना दिलेला आश्रय, कर्मापा ओगेन त्रिनले दोरजी याने डिसेंबर 1999 मध्ये ल्हासाहून केलेले पलायन व त्याला देण्यात आलेला आश्रय, या गोष्टी अद्याप चीनला सलतात. अलीकडे एशियन विकास बॅंकेकडून मिळणाऱ्या आर्थिक साह्यातही चीनने अडचणी निर्माण केल्या होत्या. भारताला अणुइंधनाचा पुरवठा सहजासहजी होऊ नये, म्हणून इंधनपुरवठादार देशांच्या संघटनेवरही दबाव आणला होता. ही सर्व पार्श्वभूमी प्रतिकूल आहे. तथापि, जमेच्या बाजू अशा- दोन्ही देशांत गेली 47 वर्षे युद्ध झाले नाही. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी भारताचे प्रमुख सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन व चीनचे सुरक्षा सल्लागार दाय बिंगुओ यांच्या वाटाघाटी सुरू आहेत. दुतर्फा व्यापाराचे प्रमाण प्रतिवर्ष 50 अब्ज डॉलरवर जाऊन पोचले असून 2010 पर्यंत ते 60 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. चीनमधील बीजिंग, शांघाय, शेंझेन, चोंगचिंग, ग्वांगझाव आदी शहरांतील अंदाजे 200 भारतीय कंपन्यांचे उद्योग व हैदराबाद, चेन्नई, मुंबई आदी शहरांत असलेली बड्या चिनी कंपन्यांची कार्यालये याकडे पाहता, आपण "परस्पर विकासाच्या वाटेवर चाललो आहोत,' असा सूर चीनच्या भेटीत परराष्ट्र व माहिती खात्याचे उच्चाधिकारी व पत्रकारांबरोबर झालेल्या चर्चेतून पुढे आला. ""दुतर्फा गुंतवणुकीचे प्रमाण 5 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. कोचीमधील मच्छीमार चिनी जाळ्यांचा उपयोग वर्षानुवर्षं करीत आहेत, याचाही उल्लेख काही अधिकाऱ्यांनी केला.'' जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील चीनविषयक तज्ज्ञ श्रीकांत कोंडापल्ली यांच्या मते दहा वर्षांपूर्वी तेथील भारतीय दूतावासात काम करणारे डझनभर भारतीय, एवढीच काय ती बीजिंगमधील भारतीयांची संख
्या होती. आज बीजिंगमधील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या भारतीयांची संख्या 2 हजार झाली असून, चीनमधील माजी भारतीय राजदूत सी. व्ही. रंगनाथन यांच्यानुसार, चीनमधील भारतीयांची संख्या (2008) अंदाजे 20 हजार झाली आहे. आम्ही "चायना डेली' या इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यालयाला भेट दिली, तेव्हा त्यात आठ भारतीय पत्रकार वेगवेगळ्या पदांवर काम करीत असल्याची माहिती खास प्रतिनिधी चित्रलेखा बसू यांनी दिली. चीनमध्ये इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
मी 2001 मध्ये चीनला भेट दिली होती, त्या वेळी इंग्रजी बोलणारे बोटांवर मोजण्याइतकेच होते. पण या भेटीत अनेक युवकांना इंग्रजीचे ज्ञान असल्याचे जाणवले. "चायना रेडिओ'मध्ये उर्दू, तमीळ, मल्याळी, हिंदी, बंगाली भाषांतून बातम्या प्रसारित केल्या जात असून, हिंदी प्रसारणाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लवकरच मोठा समारंभ होणार असल्याचे प्रतिनिधी राकेश व्यास यांनी सांगितले. बीजिंग विद्यापीठात पाली, हिंदी व संस्कृत या भाषा शिकविल्या जातात. आता बीजिंगमधील अन्य दोन व शियान, नानजिंग व चेंगडूमधील प्रत्येकी एका विद्यापीठातून हिंदीचे अध्ययन करता येणार आहे. चायना रेडिओचे संचालक ही जियानकाव व उपप्रमुख संपादक डॉ. ली झोंगशान म्हणाले, की भारतीय भाषांतून केल्या जाणाऱ्या प्रसारणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, आमच्याकडे जगभरातून आलेल्या 20 लाख 70 हजार पत्रांपैकी 80 हजार पत्रे भारतातून आली आहेत. ही पत्रे चायना रेडिओच्या प्रदर्शनातील पृथ्वीगोलात पाहावयास मिळतात.
येथील सामान्य माणसाला भारताविषयी कुतूहल असले, तरी भारताची माहिती नाही. इंग्रजी भाषा व संगणक तंत्रज्ञान या दोन गोष्टींमुळे भारत विकासाच्या मार्गावर असलेला एक देश आहे, एवढीच सर्वसाधारण माहिती आमच्या बरोबर असलेल्या ली शान व ग्रेस या दोन दुभाषींना होती. भारतीय संगीतातील फक्त "आवारा हू' हे राज कपूरचे गीत सर्वांना आठवते. गाण्याचाही प्रयत्न ते करतात. त्यातील काही ओळी शियानमधील शांक्शी दैनिकाच्या उपाध्यक्ष श्रीमती शू शावयान यांनी गाऊनही दाखविल्या. चीनमधील तरुण पिढी चीनच्या राज्यकर्त्यांचे गुणगान करीत असली, तरी त्यांना माओने आणलेल्या सांस्कृतिक क्रांतीत रस नाही, की चीनच्या रक्तरंजित इतिहासात गुंतायचे नाही. त्यांची राहणी गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदलली असून, तरुण-तरुणींची वेषभूशा पूर्णपणे पाश्चात्त्य झाली आहे. शियानमधील आमच्या दुभाषी प्रा. लिऊ युहॉंग म्हणाल्या, की सांस्कृतिक क्रांतीचे दिवस माझ्या आई-वडिलांनी पाहिले; परंतु त्याची आठवणही मला करावीशी वाटत नाही. ""माझं आयुष्य चांगलं चाललंय. आमची जीवनशैली सुधारली आहे. आज मी हवे ते कपडे घालू शकते, सौंदर्यसाधने वापरू शकते आणि मी व पती कमवते असल्यानं मुलाचं संगोपनही आम्ही चांगल्या तऱ्हेनं करू शकतो.
कुटुंबनियोजनाबाबत विचारता युहॉंग म्हणाल्या, ""वन चाईल्ड पॉलिसी' असल्यानं दुसरं मूल झालं, तर माझी नोकरी जाण्याचा धोका आहे. पहिली मुलगी झाली, तर मुलाची इच्छा असूनही काही करता येत नाही. हे धोरण अल्पसंख्याक व ग्रामीण भागात काहीसं ढिलं आहे. तिथं दुसरं मूल झालं, तर सरकारचा जाच वाढत नाही; पण तिथंही अपवादात्मक हे धोरण राबविलं जातं. चीनमध्ये खासगी व सरकारी शाळा आहेत. खासगी शाळांतील शुल्क भरमसाट असल्यानं केवळ श्रीमंत अथवा उच्चभ्रूंची मुलं तिथं शिकू शकतात. मी माझ्या मुलाला सरकरी शाळेत घातलं आहे,'' असं युहॉंग म्हणाल्या. परराष्ट्र खात्याच्या आशिया विभागाचे उपसरसंचालक सन वेडॉंग यांनी बीजिंग इथं सांगितलं, की सीमाप्रश्न गुंतागुंतीचा असूनही संबंधवृद्धीत अडचण आलेली नाही. ""अंतिम तोडगा काढण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या दस्तावेजावर दोन्ही बाजूंच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.'' दुतर्फा मैत्रीच्या जमेच्या बाजू सांगताना ते म्हणाले, की दोन्ही देशांची अडीच अब्ज लोकसंख्या ध्यानात घेता, आपण एकत्र आल्यास जगातील मोठी शक्ती बनू. आमचं धोरण विस्तारवादी नाही, की भारतावर हल्ला करावयाचा नाही. आम्हाला विकास साधायचा आहे, तो व्यापाराच्या माध्यमातून. जागतिकीकरणाच्या युगात अमेरिका असो अथवा अन्य देश, कोणीही स्वतंत्रपणे विकास करू शकत नाही. चीन हा विकसित देश आहे, असं अनेक तज्ज्ञ मानतात; पण वस्तुस्थिती वेगळी आहे. इथं एक कोटी लोक अत्यंत दारिद्य्रात जीवन जगत आहेत. 2 कोटी लोक बेरोजगार आहेत. 8 कोटी लोक पंगू अथवा शारीरिकरीत्या दुर्बल आहेत. येथे पर्यावरणाचे, प्रकल्पग्रस्तांचे, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. ते सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. युवकांना खेड्यात पाठवून त्यांच्यावर तेथील प्रशासन व अन्य काम देऊन युवकांच्या बेरोजगारीतून मार्ग काढला जात आहे.
पाकिस्तानबरोबर असलेली चीनची मैत्री भारताच्या विरोधात नाही, असे उपमंत्री चियान शावकियान यांनी सांगितले. तथापि, पाकिस्तानमधील क्षेपणास्त्रनिर्मितीबाबत चीनकडून मिळणाऱ्या साह्याबाबत भारताला नेहमीच बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल. चीनमधील खेडी पाहून तेथील शेतकऱ्यांशी बातचीत करण्याबाबत आधीच सूतोवाच झालं होतं. प्रा. युहॉंग म्हणाल्या, की शेतकऱ्यांच्या चित्रकलेचं प्रदर्शन आपण पाहणार आहोत. आम्ही उडालोच. ""आम्हाला शेतीविषयी चर्चा करायची आहे. त्यांच्या चित्रकलेविषयी नाही,'' असं सांगता, त्या म्हणाल्या, की शेतकरी वर्षभर शेती करीत नाही. धान्य बाजारात गेले, की पुढील पेरणी होईपर्यंत ते चित्रकलेचा छंद जोपासतात व त्यांची विक्री करून पैसे कमवितात. हा अभिनव प्रयोग तुम्हाला आवडेल. शियाननजीक ह्युत्स्येन कौन्टीमधील डॉंगहान गावात गेलो, तेव्हा तेथील रेखीवपणा, गावाच्या भिंतींवर काढलेली चित्रे व त्यांचे दुमजली टुमदार बंगले पाहून हरियाना व पंजाबमधील सधन शेतकऱ्यांची आठवण झाली. ""पशुपालन हा पर्यायी व्यवसायही शेतकरी करीत आहेत. केवळ पिकांवर ते अवलंबून नाहीत,'' असं पंचायतीचे संचालक गुओ जुनलियांग यांनी सांगितलं. ""ग्रामीण बॅंकातून शेतकऱ्याला साडेतीन टक्के दरानं व्याज मिळतं,'' असं त्यांनी सांगितलं. पण त्यापेक्षाही फांग जिझाई या मागासलेल्या खेड्याची भ्रमंती करताना कट्ट्यावर बसलेल्या गावकऱ्यांची गप्पाष्टकं चालल्याचं दिसलं. गावाबाहेर सिमेंटचा रस्ता होता. आतील रस्ताही स्वच्छ होता. भिंतीवर गावकऱ्यांच्या पंचायतीत चाललेल्या चर्चेची चित्रं काढलेली होती. सतराशे लोकसंख्या असलेल्या या गावातील शेतकरी मका व भातशेतीशिवाय किवी या फळाची शेती करतात. त्यामुळे उत्पन्नात भर पडल्याचं कम्युनिस्ट पक्षाचे सचिव व शेतकरी चेनजेन लियांग यांनी सांगितलं. 1962 पूर्वी "हिंदी-चिनी भ
ाई भाई' असा नारा होता. ती भावना निर्माण होणार काय, या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. त्यानंतर उलटलेल्या 47 वर्षांत जग बदललंय, तसंच चीन व भारतही बदललाय. त्यामुळे परस्पर साह्य करताना, दोन्हीकडे स्पर्धात्मक वातावरण राहणार, हे निश्चित.
